Nitish Kumar Mamata Banerjee : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या ‘विरोधक जोडो अभियान’ला मोठा झटका बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नितीश यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. ज्यात त्यांनी काँग्रेसला सोबत घेऊन काँग्रेस कोट्यातून लोकसभेची जागा डाव्या पक्षांना देण्याचे सांगितले होते. काँग्रेसला तृणमूल काँग्रेस (TMC) आणि डावे यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल, तरच प्रकरण पुढे जाऊ शकते, असे ममता यांनी स्पष्ट केले आहे.
2024 पूर्वी नितीश कुमार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) विरोधात राष्ट्रीय पातळीवर प्रभावी आघाडी उभारण्याच्या कसरतीत गुंतले आहेत. या संदर्भात नुकतीच नितीश यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि नंतर कोलकात्यात ममता आणि लखनऊमध्ये अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांची भेट घेतली.
पुढील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना त्यांच्या चक्रव्यूहात अडकवणे हा या शर्यतीचा उद्देश आहे. मात्र, नितीश यांचे प्रयत्न फळाला येताना दिसत नाहीत.
सूत्रांचा दावा आहे की ममता यांच्या भेटीदरम्यान नितीश यांनी सुचवले की बंगालमधील लोकसभा निवडणुकीदरम्यान टीएमसी आणि काँग्रेसने जागांच्या कराराच्या आधारावर लढावे. ज्यामध्ये काँग्रेस आपल्या कोट्यातून डाव्यांना जागा देईल. या फॉर्म्युल्यातून बंगालच्या तिन्ही मोठ्या पक्षांना एकत्र आणण्याचे नितीश यांचे उद्दिष्ट होते. मात्र, अप्रत्यक्षपणे डाव्यांशी युती करतानाही दिसायचे नाही, असे सांगून ममता यांनी नकार दिला.
ममतांच्या या आडमुठेपणामुळे नितीश डाव्यांशी थेट आघाडी करण्याऐवजी काँग्रेसच्या कोट्यातून ममतांना जागा देण्याचे बोलत होते. ममता बॅनर्जी यांचा असा विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीत डाव्यांसोबत दिसणे बंगालमध्ये त्यांच्यासाठी तोट्याचे ठरेल. म्हणून त्यांनी तडजोड करण्यास स्पष्टपणे नकार दिला. खरे तर त्रिपुरा आणि बंगाल या दोन्ही ठिकाणी काँग्रेसने डाव्यांशी आघाडी करून निवडणुका लढवल्या, पण त्याचा परिणाम चांगला झाला नाही.
भाजपशी स्पर्धा करण्यासाठी कोणत्याही किंमतीत मतांचे विभाजन होऊ नये, अशी नितीश यांची इच्छा होती. पण बंगालमध्ये ज्यांच्या विरोधात लढून त्यांनी सत्ता मिळवली त्यांच्यासोबत कोणत्याही प्रकारे दिसण्याचे तोटे अधिक आहेत हे ममतांना माहीत आहे. ममता यांनी काँग्रेसला डावे किंवा टीएमसी यापैकी एकाची निवड करावी लागेल, असे स्पष्टपणे सांगितले. ज्यावर काँग्रेस आणखी कोंडीत सापडली आहे. मात्र, सीपीआय(एम) नेही राष्ट्रीय पातळीवर युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.