Congress : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कर्नाटकातील सिद्धरामय्या यांच्या (Siddaramaiah) शपथविधी समारंभापासून स्वतःला दूर केले आहे. ममता बॅनर्जी कर्नाटकात जाणार नाहीत. कर्नाटकात मोठ्या विजयानंतर काँग्रेस (Congress) पक्षाला मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभात विरोधी ऐक्याचे (Opposition Unity) मोठे चित्र देशाला दाखवायचे होते. मात्र आता ममता या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने काँग्रेसच्या या योजनेला मोठा धक्का बसला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे सिद्धरामय्या यांच्या शपथविधीसाठी एकत्र बंगळुरूला जाणार आहेत. तेजस्वी यादव म्हणाले की, कर्नाटकानंतर आता बिहारमध्ये भाजप घाबरला आहे. आता त्याचे वाईट दिवस सुरू झाले आहेत.
तृणमूल काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा सदस्य डेरेक ओब्रायन यांनी ट्विट केले की, कर्नाटकचे भावी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी वैयक्तिकरित्या निमंत्रण पाठवले होते. मात्र, त्यांच्याऐवजी लोकसभेतील पक्षाच्या उपनेत्या कोकिला घोष दस्तीदार या उपस्थित राहतील.
कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जींनी आपला विचार बदलला. ममता म्हणाल्या होत्या की त्या काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात, पण त्यांची अट अशी आहे की ज्या ठिकाणी इतर पक्ष मजबूत आहेत त्यांना काँग्रेसनेही पाठिंबा द्यावा. त्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता यांची ऑफर साफ नाकारली आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा (Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra) परिणाम देशभरात दिसून येत आहे. आमचे नेते राहुल गांधी यांची देशभरात स्वीकारार्हता वाढत आहे. याचीही तुम्हाला जाणीव आहे. म्हणूनच तुम्ही असे बोलत आहात.
काही दिवसांपूर्वी ममता म्हणाल्या होत्या, मी सुरुवातीपासूनच सांगत होते की ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत तेथे पाय पसरणे बंद करा. तरच आम्ही तुमच्यासोबत येऊ शकू.
आम्ही कर्नाटकात काँग्रेसला पाठिंबा दिला आता त्यांनी पश्चिम बंगालमध्येही आम्हाला पाठिंबा द्यावा तरच भाजपला टक्कर देता येईल. ते कर्नाटकात आमच्या पाठिंब्याचा फायदा घेतील आणि पश्चिम बंगालमध्ये आमचा विरोध करतील हे योग्य नाही. हे चालणार नाही, असे ममता बॅनर्जींनी खडसावून सांगितले होते.