Malaria : सध्याच्या बदलत्या हवामान आणि मुसळधार पावसामुळे घरोघर व्हायरल आजारांचे रुग्ण वाढले आहेत. ताप, सर्दी खोकल्याच्या रुग्ण वाढले आहेत. डेंग्यू (Dengue), चिकनगुण्या या आजारांचेही रुग्ण आढळत आहेत. हिवतापाचेही (Malaria Patient) रुग्ण आढळत असून जानेवारी ते ऑगस्ट या काळात नगर जिल्ह्यात हिवतापाचे फक्त 3 रुग्ण आढळले. तसेच नाशिक जिल्ह्यात 5, धुळे 4, नंदूरबार 2 आणि जळगाव जिल्ह्यात 1 रुग्ण आढळला.
नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये हिवताप हा घातक आजार आता नियंत्रणात आला आहे. हा आजार नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. सन 2015 ते 2018 या चार वर्षांच्या काळात विभागात जवळपास 2 हजार 377 रुग्ण आढळले होते. त्यानंतर मात्र रुग्णसंख्या सातत्याने कमी होत गेली. आता तर चालू वर्षांत या जिल्ह्यांत आतापर्यंत फक्त 3 रुग्ण आढळले आहेत.
उन्हाळ्यातील जास्त तापमानात डास कमी असले तरी पावसाळ्यात मात्र डासांची संख्या वाढते. त्यामुळे या काळात रोगराईचे प्रमाणही वाढत असते. डासांमुळे अनेक आजारांचा फैलाव होतो. डेंगी, मलेरिया (हिवताप), चिकनगुण्या या आजारांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जातात. या उपाययोजनांमुळे आजार काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसते. राज्यात सध्या हिवताप निर्मूलनावर भर देण्यात आल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 2015 मध्ये हिवतापाचे 231 रुग्ण आढळले. त्यानंतर 2016 मध्ये 109, 2017 मध्ये 40 आणि 2018 मध्ये 9 रुग्ण आढळून आले. धुळे जिल्ह्यात 2015 मध्ये 232, 2016 मध्ये 127, 2017 मध्ये 80 आणि 2018 मध्ये 17 रुग्ण आढळले. नंदूरबार जिल्ह्यात (Nandurbar District) 2015 या वर्षांत 634, 2016 मध्ये 295, 2017 मध्ये 147 आणि 2018 मध्ये 51 रुग्ण आढळले. जळगाव जिल्ह्यात 2015 मध्ये 200, 2016 मध्ये 64, 2017 मध्ये 32 तर 2018 मध्ये 6 रुग्ण आढळले. नगर जिल्ह्यात २०१५ मध्ये ५५, २०१६ मध्ये २४, २०१७ मध्ये १३ आणि २०१८ मध्ये ११ रुण आढळले. मागील वर्षात नंदूरबार ४, नाशिक ३, धुळे २, जळगाव आणि नगरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला होता. त्यानंतर चालू वर्षात नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) फक्त 3 रुग्ण आढळल्याने जिल्ह्यात सध्या हिवताप नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.
या काळात नाशिक विभागातील नगर, नाशिक, नंदूरबार, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यातील १५ लाख ९२ हजार ८०५ रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर अहवाल आल्यानंतर यामधील १५ नमुने पॉजिटिव आढळून आले. विभागात नियमित रक्त संकलन करून तत्काळ तपासणी करण्यात येऊन समूळ उपचार करण्यात येत असल्याने हिवताप रोखण्यात यश आले आहे. नागरिकांत जनजागृती करण्यात येत असल्याने या आजाराबाबत लोकांनाही बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळे आजार रोखण्यात मदत होत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.