Mahayuti Government: गेल्या अनेक वर्षांपासून पाण्यापासून वंचित राहीलेल्या दुष्काळी पट्टयातील बारा गावांसाठी महायुती सरकारने दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने भोजापूर चारीच्या 16 किलो मीटर काम अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून भोजापूर चारीचा प्रश्न प्रलंबित असल्याने भोजापूर धरणात पाणी असूनही शेतकऱ्यांना पाणी पासून वंचित होते. विशेष म्हणजे ही गावे निळवंडे पाण्यापासून वंचित राहीलेली होती.
या गावांना भोजापूर पाण्याशिवाय पर्याय नव्हता.निधी अभावी कामाची सुरूवात होत नव्हती.बहुतेक वेळा ठेकेदार बदलत गेल्याने कामातही अडथळे निर्माण होत होते.
महायुतीचे सरकारने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंधारण विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे या चारीच्या कामाला सुरूवात होवू शकली.आता चारीचे काम अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा अधिकच वाढल्या आहेत. पावसाळ्यात या चारीतून पाण्याचे वहन होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
तळेगाव भाग नेहमीच दुष्काळी म्हणून ओळखला जायचा.आता निळवंडे कालव्यातून पाण्याची उपलब्धता झाल्याने वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना युती सरकारमुळे न्याय मिळाला.
आता भोजापूर चारीच्या सर्वच कामामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.भोजापूर लाभक्षेत्रातील शेतकर्याची अनेक वर्षांची प्रतिक्षा आता संपुष्टात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.