अहमदनगर : जिल्ह्यात दिवंगत माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांचा वेगळा दबदबा होता. राज्यासह देशाच्या राजकारणात त्यांना मनाचे स्थान होते. आता त्यांचे पुत्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तोच दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करताना अनेकदा यश मिळवले आहे. त्याचाच कित्ता गिरवत जिल्ह्यावर पकड मजबूत करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे हेही कार्यरत असताना पारनेर-नगरचे आमदार आणि राज्यात वेगळ्या अर्थाने लौकिक असलेल्या निलेश लंके यांनी जिल्ह्यात राजकारणात रस घेतला आहे.
आमदार लंके यांनी थेट डॉ. विखे यांना आव्हान देताना आगामी लोकसभा लढवण्याची इच्छाही जगजाहीर करून टाकली आहे. प्रस्थापितांना धक्का देऊन नवा गट स्थापन करण्याच्या प्रयत्नात सध्या आमदार लंके आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीतही त्याच अर्थाने उतरण्याची तयारी लंके गटाच्या समर्थकांनी केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नगर दक्षिण भागात डॉ. विखे विरुध्द लंके असाच थेट सामना रंगणार आहे.
डॉ. विखे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना लंके यांनी पळशी येथील कार्यक्रमात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच्या बातम्या येत असल्याने आता जिल्ह्यात विखे-लंके अशीच राजकीय लढाई रंगणार असून ती पाहण्याची इच्छा जनतेची असल्याचे चर्चेतून स्पष्ट दिसत आहे. त्यासाठीचे खरे घोडामैदान ठरणार आहे जिल्हा परिषद निवडणूक.
कारण, सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेऊन भाजपला आणखी भक्कम करण्यासाठी विखे गट प्रयत्नशील आहे. तर, लंके यांच्यासह अनेकजण विखे यांना झेडपीच्या बाहेर ठेवण्यासाठी त्यावेळी आक्रमक पवित्रा घेतील अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे झेडपी निवडणुकीच्या निकालावर जिल्ह्याच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट होईल असेच म्हटले जात आहे. त्यात कोण बाजी मारणार, याकडे अवघ्या राज्याचे लक्ष असणार आहे.
‘गुगल न्यूज’वर लाइव्ह न्यूज, लेख आणि मार्केट अपडेट वाचण्यासाठी https://bit.ly/3xX9aSV या लिंकवरून ‘कृषीरंग’ला फॉलो करा
- वाव.. विखेंच्या विरोधात राष्ट्रवादीला मिळाला तगडा उमेदवार; लंकेंनी सांगितलाय दक्षिणेवर हक्क..!
- विखेंच्या रेमिडीसिवीरवरून चर्चेला उधाण; बातम्यामधून वेगवेगळे आकडे आल्याने मुद्दा ट्रेंडमध्ये, पहा वास्तव