करोना कालावधीत एमपीएससी परीक्षा रद्द झाल्यावर झालेला गोंधळ आपण पाहिला असेल. आता युपीएससी परीक्षाही रद्द झालेली आहे. त्याच्याही बातम्या आलेल्या आहेत. लाखो स्पर्धा परीक्षार्थी त्यामुळे निराश झालेले आहेत. पण पर्याय नाही. कारण करोना संकट खूप मोठे आहे. अशावेळी एकूण गणित लावून या परीक्षेच्या यशाची टक्केवारी तपासली जात आहे. एकूण लोकसंख्येच्या 5 टक्के इतक्याही सरकारी नोकऱ्या आता भारतात शिल्लक नाहीत. मग त्यासाठी जीवघेणी अशी स्पर्धा चालू असते. त्यातच भारतात नोकरभरती आणखी कमी होत आहे. मात्र, तरीही अभ्यास करणाऱ्यांचा किंवा नव्याने याची तयारी करणाऱ्यांचाही जोश कमी झालेला नाही. त्यामुळे आपणही याबाबत यापुढे काही लेखांमध्ये याची माहिती घेणार आहोत. कारण, कितीही नोकऱ्या कमी झाली तरी, हा एक नोकरीचा पर्याय तर आहेच की.
या परीक्षांची काठिण्य पातळी अधिक वाढवण्यात आल्याने स्पर्धा परीक्षांची तयारी दहावी, बारावीपासून केली तर लवकर यश मिळवणे शक्य होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेकांना चार ते पाच वेळा प्रयत्न करावे लागतात. पहिल्या किंवा दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. म्हणजेच ते अपवाद आहेत. बरेच विद्यार्थी बारावीनंतर चार-पाच वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण करून स्पर्धा परीक्षांकडे वळतात. त्यामुळे त्यांची तयारी उशिरा सुरू होते व पुढे परत चार-पाच वर्षे अभ्यासात गेल्याने ते लवकर यश संपादन करू शकत नाहीत.
शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली आणि त्यात जर अपयश आले तर आपल्या भविष्याचे काय? आपणास पुढे नोकरी मिळेल का? आपण पदवी अभ्यासक्रमापासून बरेच दिवस दूर असल्याने आपल्या शिक्षणाचा नोकरीमध्ये कितपत फायदा होऊ शकेल. असे अनेक प्रश्न त्यांना सतावत असतात. पण जो विद्यार्थी सातत्याने कष्ट घेतो तो निश्चित कोणत्या तरी परीक्षेत यश मिळवतो. अनेकजण पदवी शिक्षणानंतर खासगी नोकरी पत्करतात. त्यानंतर दोन-तीन वर्षांनंतर स्पर्धा परीक्षेकडे वळतात. त्यामुळे त्यांची द्विधा मन:स्थिती होते परिणामी त्यांना मनाजोगते यश मिळत नाही. काही विद्यार्थ्यांना खासगी नोकरी केल्यानंतर आपल्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वात बदल होतो असे वाटते. ते अगदी खरे आहे. नोकरीच्या अनुभवातून आपले आचारविचार समृद्ध होतात. वाचन, लेखन, बैठका, नियोजन यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. याचा मुलाखतीसाठी उपयोग होऊ शकतो. परंतु नोकरीमध्ये गेलेला वेळ भरून निघत नाही. परिणामी आपली उशिराने निवड होऊ शकते. *(मात्र, तरीही येथील एकूण नोकऱ्यांची संख्या लक्षात घेता पर्यायी विचार करूनच अशा परीक्षांचा अभ्यास करावा @टीम कृषीरंग)
दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी असा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नेहमीच पडतो. जे विद्यार्थी दहावी, बारावीला आहेत. त्यांनी उन्हाळ्याच्या सुटीत जर एमपीएससी किंवा युपीएससी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या फाऊंडेशन कोर्सला प्रवेश घेतला तर त्यांना योग्य दिशा मिळू शकेल. यशस्वी उमेदवारांची मार्गदर्शनपर व्याख्याने ऐकावीत. त्यांची विविध मासिके, वर्तमानपत्रे, अनियतकालिके यामधून प्रकाशित झालेल्या मुलाखती वाचाव्यात. परीक्षासंदर्भातील आपल्या सर्व शंका दूर करण्यासाठी सर्व बाजूचे लेखन आणि माहिती वाचून मग आपली क्षमता आणि एकूण परिस्थिती लक्षात घेऊन याबाबतचा निर्णय घेऊन नियोजन करावे..
सामान्य अध्ययन या घटकासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वर्तमानपत्रातील क्रीडा घडामोडींशी संबंधित पान वाचून त्याच्या नोंदी कराव्यात. लोकराज्य, योजना, यशदा-यशमंथन, कुरुक्षेत्र ही मासिके नित्यनियमाने वाचायला हवीत. वर्तमानपत्रे ही सामान्य अध्ययनासाठी त्याचबरोबर निबंधासाठी व मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. साधारणत: वर्तमानपत्राचा या परीक्षांसाठी 20 ते 25 टक्के वाटा आहे म्हणून लहानपणापासून मुलांना वर्तमानपत्रे वाचण्याबाबत प्रवृत्त केले पाहिजे. दूरचित्रवाहिन्या व आकाशवाणीवरील मराठी व इंग्रजी बातम्याही दररोज ऐकायला हव्यात.
लेखन, मनन, वाचन, चिंतन आणि मेहनत या पंचसूत्रीतून प्रभावी लेखन कौशल्य सुधारता येते. आपले संवाद कौशल्य सुधारले पाहिजे.लिखाणाची चांगली शैली विकसित करायला हवी. लेखनाचा उपयोग निबंध या विषयाच्या पेपरसाठी प्रामुख्याने होतो. कारण निबंध लेखन हे आपल्याला अधिक गुण मिळवून देण्यास मदत करते. लेखनाची तयारी करताना अनेक पुस्तकांचे, साहित्यांचे वाचन आवश्यक आहे. सरावाने आपले लेखन कौशल्य बालपणापासून विकसित करता येऊ शकते.
लेखक : डॉ. बबन जोगदंड, (संशोधन अधिकारी (प्रकाशन), ‘यशदा’ संस्था) *माहिती स्रोत: महान्यूज
- कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
- | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.