Maharashtra Weather Updates: राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पावसाने जुलै महिन्यात कहर केला होता. कोकण विदर्भसह अनेक भागात मुसळधार पावसाने हाहाकार माजविला होता.
तर आता ऑगस्ट महिन्यात राज्यात बहुतेक भागात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन महिने मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने ऑगस्ट आणि सप्टेंबरचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार एल-निनोचा प्रभाव पावसाळ्यात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट महिना कोरडा राहील, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता कमी आहे.
ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एल निनोचा प्रभाव पावसाळ्यात वाढण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे आयओडी पॉझिटिव्ह राहील, असा अंदाज आहे. गेल्या दोन महिन्यांत अल निनोचा मान्सूनवर फारसा परिणाम झाला नाही, त्यामुळे जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला.
3 दिवस पावसाचा इशारा!
मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 2, 3 आणि 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात ऑगस्ट महिन्यातील बहुतांश दिवस कोरडे राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. ऑगस्टचा पहिला आठवडा वगळता राज्यात पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 2 ऑगस्ट रोजी विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 3 ऑगस्ट रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना आणि परभणी येथे 4 ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.