Maharashtra Weather Update : सध्या देशातील अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केला आहे. या मुसळधार पावसामुळे देशातील डोंगराळ भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
तर दुसरीकडे राज्यात मान्सून आता कमकुवत झाला आहे. ज्याच्या परिणाम राज्यातील अनेक भागांतून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील पाच दिवस महाराष्ट्रात कुठेही मुसळधार पावसाची शक्यता नाही. मात्र, मुंबई, पुण्यासह कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल. आयएमडीने सांगितले की, पुणे आणि उर्वरित महाराष्ट्रात पाच दिवसांत लक्षणीय पाऊस होणार नाही.
सुमारे दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होईल, असे हवामान खात्याने गेल्या आठवड्यात सांगितले होते. आयएमडीने म्हटले आहे की ईशान्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून काही प्रमाणात मजबूत होण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यामुळेही पाऊस वाढण्यास फारसा उपयोग झाला नाही. मात्र, आकाश ढगाळ राहिल्याने राज्यभरात हलका पाऊस झाला.
महाराष्ट्रासाठी ऑगस्ट महिना कोरडा राहिला आहे. राज्यात पावसाची 58 टक्के तूट नोंदवण्यात आली आहे. राज्यात सरासरी 207.1 मिमीच्या तुलनेत केवळ 86.4 मिमी पाऊस झाला आहे. तर, ऑगस्टच्या सुरुवातीपासून पुणे जिल्ह्यात सरासरी 209.8 मिमी पावसाच्या तुलनेत 65 टक्के तूट नोंदवली गेली आहे. पुण्यात आतापर्यंत केवळ 73.5 मिमी पाऊस झाला आहे.
विशेष म्हणजे, जुलै महिन्यात महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला, त्यामुळे राज्यात पावसाळा सुरू झाल्यापासून केवळ 7 टक्के पावसाची तूट झाली आहे. आतापर्यंत, महाराष्ट्रात सरासरी 741.10 मिमीच्या तुलनेत 692.70 मिमी पाऊस झाला आहे. मात्र, जुलै महिन्यापासून पावसाने दडी मारली असून तीन आठवड्यांच्या या प्रचंड खंडामुळे राज्यभरातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे.