Maharashtra Weather Update: पुन्हा एकदा राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यातच पुढील तीन ते चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.
सध्या राज्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. येत्या 48 तासांत मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनच्या पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने शुक्रवारी आणि शनिवारी अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट तर 9 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD ने आज वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर येथे मुसळधार पावसाचा अंदाज देत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
तर मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, भंडारा आदी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा यलो इशारा जारी करण्यात आला आहे.
शनिवारी अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचबरोबर अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वाशीम या सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांसह संपूर्ण कोकण भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. याशिवाय रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तुरळक पाऊस झाला.