Maharashtra Weather Update : राज्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पाऊस विश्रांतीवर आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसाकडे होणार आहे. ही बाब शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे.
गुरुवार किंवा शुक्रवारच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ते हळूहळू पश्चिम-वायव्य दिशेने सरकणे अपेक्षित आहे.
त्याच्या प्रभावाखाली मुंबईत 19-20 ऑगस्टच्या सुमारास चांगला पाऊस पडेल. मात्र सध्या मुसळधार पाऊस अपेक्षित नाही.
तर ऑगस्ट महिन्यात राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीचे वरिष्ठ हवामान तज्ज्ञ केएस होसाळीकर म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या सात दिवसांत जवळपास पाऊसच झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः मराठवाड्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे.
तथापि, मराठवाड्याच्या काही भागांत पुढील 3-4 दिवसांत वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 20 ऑगस्टपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञ होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार एल निनोचा जोर वाढत असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येत आहे.