सातारा : भाजपाचे राज्यसभेचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले आणि त्यांचे चुलत बंधू शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील संघर्ष साताऱ्यात नवीन नाही. मात्र सध्या उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघेही एकाच पक्षात म्हणजे भाजपात आहेत. तर 22 फेब्रुवारीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांची भेट झाल्याने त्यांच्यातील संघर्षाला विराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र तरीही काल दोन्ही राजे समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आपल्या विविध विधानांनी चर्चेत असतात. मात्र साताऱ्यात शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांच्यात कायम संघर्ष रंगलेला पहायला मिळतो. याआधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. तर आता दोघेही भाजपात आहेत. मात्र तरीही त्यांच्यात संघर्ष कायम आहे.
काल सातारा येथे उदयनराजे भोसले यांचे समर्थक आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्या समर्थकात जोरदार राडा पहायला मिळाला. त्यामुळे साताऱ्यात खळबळ उडाली होती. या घटनेचे कारण म्हणजे, उदयनराजेंचे समर्थक सनी भोसले आणि शिवेंद्रराजे यांचे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद झाला. तर पुढे या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले.
नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गापेठेतील कार्यालयासमोर गाडी लावण्याच्या कारणांवरून वाद सुरू झाला होता. मात्र दोन्ही गटात झालेल्या हाणामारीत 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तर यामध्ये धारदार शस्राचा वापर करण्यात आल्याची चर्चा आहे. यात उदयनराजे समर्थक सनी भोसलेसह 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी सातारा पोलिस स्टेशनमध्ये शिवेंद्रराजे यांचे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी 22 फेब्रुवारीरोजी भेट घेतल्याने दोन्ही राजेंमध्ये संघर्षविराम झाल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता पुन्हा एकदा दोन्ही राजे समर्थकांत राडा झाल्याने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. आता दोन्ही राजे मध्यस्ती करून समर्थकांचं मनोमिलन घडवणार का? किंवा त्यांच्यातील संघर्ष अजून वाढणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.