Maharashtra Sangli Accident : खासगी ट्रॅव्हल्स बस आणि कारची धडक होऊन गुरुवारी सांगलीमधील विटा नेवारी रोडवर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर एअर बॅग उघडल्यामुळे एकाचा जीव वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या कारची आणि खाजगी बसची समोरासमोर धडक झाली. कार चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारने प्रायव्हेट ट्रॅव्हल्सला धडक दिली. याप्रकरणी विटा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
गुरुवारी सकाळी ७ वाजता हा भीषण अपघात झाला. गीतांजली ट्रॅव्हल्सची बस विट्याहून नेवरीकडे जात होती. यामध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मुंबईहून विट्याकडे जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटून बसला धडक बसल्याचे सांगण्यात येत आहे. कार चालकाच्या झोपेमुळे हा अपघात झाल्याचे घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.
अपघात कसा झाला?
विटा महाबळेश्वर राज्य महामार्गावरील शिवाजी नगरजवळ हा अपघात झाला. या अपघातात तासगाव तालुक्यातील गाव येथील काशीद कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला आहे. कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला.
तर सदानंद काशीद यांचे प्राण एअरबॅगमुळे वाचले. बस विटा येथून साताऱ्याकडे जात होती. कार साताऱ्याहून विट्याच्या दिशेने येत असताना. अपघाताच्या वेळी कारचा वेग खूपच जास्त होता. त्यामुळे बसला धडकल्यानंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे निकामी झाला. कारचे इंजिनही खराब झाले. सर्व कारस्वार लक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी मुंबईहून गावी गेले होते.