Maharashtra Rain । राज्यात सगळीकडे पावसाने चांगलाच जोर धरला आहे. जर तुम्ही कामाशिवाय घराबाहेर पडत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण हवामान खात्याने काही जिल्ह्यात अती मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. अशातच आता राज्यात वादळी वाऱ्यासह अती मुसळधार पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान खात्याकडून भंडारा, रत्नागिरी, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. रायगड, कोल्हापूर आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाची पट्टा तयार झाला असल्याने 19-21 जुलै दरम्यान कोकण,पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार-अति मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान खात्याने मुंबई, पुणे, ठाणे या भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.
काल लोणावळ्यात 148 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली असून या ठिकाणी रविवारी आणि शनिवारी या दोन दिवस जोरदार पाऊस झाला होता. त्यानंतर मागील चार दिवस पावसाने दडी मारली होती. त्यानंतर आता गुरुवारी दिवसभर मुसळधार पावसाने चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर रत्नागिरी जिल्ह्यात गुरुवारी रात्री पावसाचा जोर वाढला असून किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे.