Maharashtra Rain Alert: राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दांडी मारल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. कमी पावसामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल झाले आहे. मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे.
आज सकाळपासूनच विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सध्या चांगल्या पावसाची नितांत गरज आहे. कारण खरीप पिके पाण्याअभावी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा जोर वाढल्याने येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. मुसळधार पावसाची शक्यता दर्शवत दहा जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांसाठी पाऊस आणि वादळाचा इशाराही (यलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्याच्या विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. तर उर्वरित महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस पडेल. आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्हे आणि विदर्भातील काही भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. 14 ते 17 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रातील किमान दहा जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होईल. त्यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जाणून घ्या कधी आणि कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस
14 सप्टेंबर- भंडारा, गडचिरोली, गोंदिया
15 सप्टेंबर- नागपूर, अमरावती, वर्धा
16 सप्टेंबर- अकोला, वाशिम, बुलढाणा, अमरावती
17 सप्टेंबर- बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
ऑगस्ट महिन्यात पाऊस न पडल्याने बहुतांश शेतजमिनीत पुरेसे पाणी नाही. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई आणि पुण्यातही पावसाची शक्यता
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह पूर्व महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. तर 15 सप्टेंबरच्या आसपास संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढू शकतो. मात्र मुंबई आणि उपनगरात काही दिवस पाऊस न पडल्याने उष्मा वाढणार आहे.
हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्याच्या प्रभावामुळे 17-19 सप्टेंबर रोजी महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. तर मुंबई आणि त्याच्या लगतच्या जिल्ह्यांमध्ये 17-18 सप्टेंबरच्या सुमारास मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17-19 सप्टेंबर दरम्यान पुण्यातही चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.