Maharashtra rain alert । जर तुम्ही आज कामाशिवाय घराबाहेर पडत असाल तर त्यापूर्वी ही बातमी वाचा. नाहीतर तुम्ही संकटात येऊ शकता. कारण आजही भारतीय हवामान खात्याकडून विविध जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने आज ठाणे , पुणे, रायगड, अमरावती, नागपूर, वर्धा, सातारा, सिंधुदुर्ग, अकोला, यवतमाळ, नांदेड या जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच मुंबई, पालघर, पुणे, अहमदनगर, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, धाराशीव, बीड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोदींया, भंडारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार मुंबईत सुरु होती. अधूनमधून पावसाचा जोर वाढत असल्याने काही सखल भागत पाणी साचत होते. पण आज या भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. कल्याण डोंबिवली परिसर ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तवली जात असून नागपुरमध्ये काल मुसळधार पाऊस झाला. या ठिकाणी आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे पावसाचा जोर वाढणार का याकडे लक्ष लागले आहे.
विदर्भात मुसळधार पाऊस
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात पाऊसाची संततधार सुरुच आहे. इरई धरणाचे 7 दरवाजे 1 मीटरने उघडले आहे. धरणातून 462 क्यूबिक मीटर प्रति सेकंद या वेगाने पाणी सोडले जात असल्याने जिल्हा प्रशासनाने इरई नदीकाठच्या गावांसह चंद्रपूर शहरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यात रविवारी सकाळीच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर पावसामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.