Maharashtra Rain: राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. या मुसळधार पावसामुळे हवामानात देखील झपाट्याने बदल दिसून येत आहे.
यातच आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने 16-17 सप्टेंबरसाठी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि धुळे या शहरांसाठी 16 आणि 17 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला होता. त्याचबरोबर मुंबईसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
वीकेंडला पाऊस
आपल्या ताज्या अंदाजानुसार, हवामान खात्याने 16 सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अकोला, वाशीम जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील मुसळधार पावसाचा कालावधी 18 सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी, रविवारी (17 सप्टेंबर) ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, नंदुरबार आणि सातारा येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विशेषतः घाट भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पावसाचा जोर का वाढणार?
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आजही अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकत असून महाराष्ट्रात पाऊस आणि वारे आणत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ सोमा सेन यांनी सांगितले की, “शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकू शकते, त्यामुळे पश्चिम मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या उत्तर भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. ईशान्य भारतात पावसाची फारशी शक्यता नाही. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.