Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या महाविकास आघाडीच्या भवितव्याची चर्चा जोरात सुरू आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते महाविकास आघाडी एक असल्याचे म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वक्तव्याने धाकधूक वाढली आहे.
शरद पवारांच्या वक्तव्याकडे पाहता, असे म्हणता येईल की काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या युतीबाबत अनिश्चितता आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्यातील आघाडीच्या भवितव्याबाबत मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात भाजपविरोधी पक्षांची आघाडी तुटल्यास काँग्रेसने आपला प्लॅन ‘बी’तयार ठेवला आहे, असे ते बुधवारी म्हणाले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी हा दावा केला आहे. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणूक लढवायची आहे. मात्र महाविकास आघाडीत फूट पडली तर आम्ही नियोजन केले आहे.
मुलाखतीदरम्यान विचारले गेले की आघाडीतील घटकांपैकी कोणत्या पक्षाला महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री होण्याची संधी मिळेल? यावर पटोले म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबत अशी चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. सध्या निवडणुका होणार नसल्याने या पैलूवर चर्चा करण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले. मात्र जनतेच्या प्रश्नांवर काँग्रेस दररोज लढत असल्याचा दावा त्यांनी केला.
अजित पवार यांच्याबाबत सुरू असलेल्या अटकळींवरही प्रदेश काँग्रेस अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री कोण व्हायचे हे जनता ठरवते, असे ते म्हणाले. अशा स्थितीत त्यावर चर्चा करणे योग्य नाही. निवडणूक जाहीर झाल्यावर त्यावर चर्चा होईल. ते पुढे म्हणाले की, पक्ष म्हणून निर्णय घेणे सोपे आहे. ज्या पक्षाचे सर्वाधिक आमदार आहेत त्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे, ‘मविआ भविष्यात राहील की नाही, हे आताच सांगणे कठीण आहे. महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संधीचा फायदा उठवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
दरम्यान, प्रदेश काँग्रेस प्रमुखांच्या ताज्या वक्तव्याने या अटकळींना आणखीच खतपाणी घातले गेले आहे. अजित पवार (Ajit Pawar) सत्ताधारी भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबतची आघाडी युती तोडून टाकतील, अशी अटकळ महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपण राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे ठणकावले आहे.