Maharashtra Politics : ठाकरे गटाचा अजित पवारांवर निशाणा! “बारामतीत ज्या भावाने लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा…”

Maharashtra Politics : राज्यातील खास महिलांसाठी राज्य सरकारकडून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. सरकारच्या नवीन योजनेनुसार राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेवरून आता विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाकरे गटाने दैनिक सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यंमत्री अजित पवारांवर निशाणा साधला आहे. “या सर्व योजना जनहिताच्या आहेत, जनतेला थेट लाभ देणाऱ्या आहेत, असा या मंडळींचा कांगावा आहे. पण त्या खरंच तशा आहेत का? त्याचा थेट लाभ जनतेला मिळेल का? असा सवाल अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

“अर्थसंकल्पातील असंख्य घोषणांची अवस्था आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार? अशी आहे. अजूनही राज्यातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला नाही. पण अर्थसंकल्पात कोरड्या घोषणांचा पाऊस पाडला. थापांचा महापूर तसेच खोट्या आश्वासनांची अतिवृष्टी केली. याच खोट्या आणि जुमलेबाज आश्वासनांच्या फुग्यांमध्ये श्रेयाची हवा भरण्याचे काम सध्या सत्तापक्षांमध्ये सुरू आहे,” असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

“या सरकारला मागील अडीच वर्षे राज्यातील लाडक्या बहिणींचा विसर पडला होता. पण लोकसभा निवडणुकीतील दणक्याने त्यांना आता अचानक बहिणींची उचकी लागली. त्यातूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर केली आहे. लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या-नाशकात ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करीत असल्याने या भावांसाठी बहिणी आक्रोश करीत आहेत”, अशी जहरी टीका ठाकरे गटाने केली आहे.

Leave a Comment