Maharashtra Politics: पुणे : शिवसेना (Shivsena) आणि शिवसेनेतील बंडखोर आमदारांमध्ये सत्तासंघर्ष सुरू असताना त्यावर आता शिवसेनेचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas danave) यांनी कडाडून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटातील नेत्यांची भाषा मस्तीची आहे. त्यांना मिळालेल्या खोक्यातून ही मस्ती आलेली आहे असा जबरदस्त हल्ला दानवे यांनी शिंदे गटावर चढवला.
विधान परिषदेत विरोधी पक्षनेते झाल्यानंतर ते पहिल्यांदा पुण्यात आले होते. गणेशोत्सवानिमित्त (Pune Ganesh festival) दानवे यांनी शहरातील काही प्रमुख गणेश मंडळांना भेटी देऊन दर्शन घेतले. त्यापूर्वी त्यांनी आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gohre) यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना मुंबईत महापालिकेच्या (Mumbai municipal corporation) आगामी निवडणुकीसाठी यावे लागते, हाच आमच्या शिवसेनेसाठी नैतिक विजय आहे. आमचा मुंबई महापालिकेमधील विजय हा दैदिप्यमान असेल. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेत्यांची भाषा मस्तीची आहे. त्यांच्याकडे आलेले खोक्यांची ही भाषा आहे.
उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला झाला, असे सांगण्यात आले होते. त्यावेळी अनेकांना अटक झाली. मात्र, या दडपशाहीला आम्ही घाबरत नाही. शिवसेना ही जमिनीवरच असून ते आकाशात आहेत. आम्ही त्यांना चांगले आकाश दाखवू. शिवसेना फक्त निवडणुकीसाठी काम करत नाही. आम्ही जनतेसाठी काम करतो, त्यामुळे आमचा मुंबईत विजय होईल. १९६६ पासून शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. यावर्षीही शिवाजी पार्कवर शिवसेनेचाच दसरा मेळावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होईल. मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप यांच्या संभाव्य युती संदर्भात दानवे म्हणाले, ज्या राज ठाकरे यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ दाखवून कोणाला टार्गेट केले. ते नेमकी आता काय बोलणार याकडे जनतेचे लक्ष असेल.