Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गंभीर आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपाचा (BJP) प्लॅन बी सुरू आहे, असा दावा त्यांनी केला होता.
त्यानंतर आज शरद पवार यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राजीनामा मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यांना चव्हाणांच्या या वक्तव्याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारले. त्यावर पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले.
ते म्हणाले, काही लोकांची मतं पक्की असतात. ती पक्की मतं असणाऱ्यांपैकी ज्याचं नाव आपण घेतलं ते गृहस्थ आहेत. त्यांचं पक्कं मत असं असतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येक वेळी मत व्यक्त करण्याचा प्रश्न आला की त्यांचं मत आमच्याबाबत प्रतिकूल असतं. त्यामुळे आम्ही त्याची कधी गांभीर्याने नोंद घेत नाही आणि लोक किती गांभीर्याने घेतात हे माहिती नाही.
अनेक आमदार दुसऱ्या पक्षात जाणार होते म्हणून राजीनामा दिला का, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना पवार म्हणाले, कोणताही पक्ष असू द्या, जर कुणाला पक्ष सोडून जायचं असेल तर त्यांना कुणीही अडवत नाही. त्यासाठी पक्षाच्या नेत्याने स्वतः नरमाईची भूमिका घेण्याची गरज नाही.
दरम्यान, मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस कमिटीची बैठक झाली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
हा प्रस्ताव समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने मंजूर केला. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या समितीचा निर्णय आणि कार्यकर्त्यांचा विरोध पाहता अखेर शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला.
खुद्द शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा मागे घेण्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला रोहित पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते मात्र अजित पवार पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेच पत्रकारांनीही या मुद्द्यावर पवारांना प्रश्न केला.
तेव्हा शरद पवार म्हणाले, “इतर लोक इथे आहेत. समितीने हा निर्णय घेतला आणि त्यांच्या निर्णयानंतर मी माझा निर्णय मागे घेतला. सर्वजण एकत्र येऊन चर्चा करत आहेत. समितीत ज्येष्ठ नेते आहेत.
शरद पवार यांना अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल विचारले असता ते म्हणाले, “प्रत्येकजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत आणि काही लोक नाहीत. मात्र आज सकाळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकमताने निर्णय घेऊन तो माझ्यापर्यंत पोहोचवला.
त्या निर्णयाद्वारे सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यामुळे इथे कोण उपस्थित आहे आणि कोण नाही असा प्रश्न उपस्थित करणे किंवा त्याचा अर्थ लावणे योग्य नाही.”