Maharashtra Politics : लोकसभा निवडणुका जवळ आल्या (Maharashtra Politics) आहेत. राजकीय पक्षांनी या निवडणुकीची जोरदार तयारी (Lok Sabha Election) सुरू केली आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अजूनही (Elections 2024) सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवर पेच निर्माण झाला आहे. तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अपेक्षेपेक्षा जास्त जागा मागितल्याने भाजपसमोरील अडचणी वाढल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेने 22 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांची मागणी केली आहे. परंतु, इतक्या जागा देण्यास भाजप तयार होणार नाही, हे देखील निश्चित आहे.
याआधी भाजपने 17 राज्यांतील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नव्हते. जागावाटप रखडल्याने महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा झाली नाही अशी चर्चा होत आहे. शिवसेनेने मागील निवडणुकीत जिंकलेल्या 18 जागांसह 22 जागांची मागणी केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने दहा जागांची मागणी केली आहे. तर दुसरीकडे असेही काही मतदारसंघ आहेत ज्याठिकाणी तिन्ही पक्षांनी दावा ठोकला आहे.
Lok Sabha Election 2024 : कुणाला मिळालं तिकीट, कुणाचा पत्ता कट? ‘या’ दिग्गजांची उमेदवारी निश्चित
Maharashtra Politics
भाजपानेही जागावाटपाचा वेगळा फॉर्म्यूला तयार केला आहे. यानुसार शिवसेनेला सात जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) फक्त चार जागा देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. तसेच मित्रपक्षांना दोन जागा देण्याचीही तयारी आहे. परंतु, या जागावाटपाला शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. अशा परिस्थितीत या तिन्ही पक्षात जागावाटपावरून धुसफूस वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागावाटपात अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळे अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा, रायगड, सातारा, शिरुर, हिंगोली, बुलढाणा, धाराशिव, गडचिरोली, परभणी आणि बारामती या मतदारसंघांची मागणी केली आहे. तर शिवसेनेने यवतमाळ-वाशिम, रामटेक, सातारा, हातकणंगले, अमरावती, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, बुलढाणा, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी यांसह मुंबईतील तीन मतदारसंघांची मागणी केली आहे.
Maharashtra Politics
दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जागावाटपाबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठीच शहा महाराष्ट्रात आल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात भाजपाने जास्तीत जागा लढवाव्यात अशी भूमिका केंद्रीय नेत्यांचीही आहे. तर दुसरीकडे उमेदवारांची दुसरी यादी लवकरात लवकर जारी करण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे आता अमित शहा आता जागावाटपावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.