Maharashtra Politics । विधानसभेपूर्वी भाजपला मोठं भगदाड! बडा नेता करणार ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Politics । लोकसभेनंतर आता अवघ्या काही महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. लोकसभेत महाराष्ट्रात महायुतीला महाविकास आघाडीकडून पराभव सहन करावा लागला होता. पराभवामुळे आता महायुती आगामी निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच तयारीला लागली आहे.

छत्रपती संभाजीनगर मधून मोठी राजकीय बातमी समोर आली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे तब्बल 16 नगरसेवक हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधानसभेपूर्वी भाजपसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरु केली असून आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरचा दौरा करणार आहेत. दौऱ्यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यावेळी भाजपच्या बड्या नेत्यासह काही नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील भाजपाचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर राजू शिंदे हे आज ठाकरे गटात प्रवेश करतील. इतकेच नाही तर त्यांच्यासोबत शिंदे गटाचे काही कार्यकर्ते देखील आपल्या हाती शिवबंधन बांधणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेलो पाहिजे, अशी कार्यकर्ते आणि नागरिकांची इच्छा आहे, असे राजू शिंदे यांनी म्हटलं आहे.

भाजप तसेच शिंदे गटाकडून राजू शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. केंद्रीय मंत्री भागवत कराड, तसेच रावसाहेब दानवे यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. पण तरीही राजू शिंदे हे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम होते. आज त्यांच्यासोबत भाजपचे किती नगरसेवक शिवबंधन बांधतील? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Leave a Comment