Maharashtra politics । राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला चांगला फायदा झाला. तर महाविकास आघाडीला अपेक्षित असे यश मिळाले नाही.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीत खूश नाही असे पाहायला मिळत आहे. कारण सूत्रांच्या माहितीनुसार अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली करायला सुरुवात केली आहे. अशातच अजित पवारांनी महायुतीविरुद्ध बोलायला सुरुवात केली आहे.
“अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी निलेश लंके हे महायुतीकडून लढवण्यासाठी इच्छुक होते. पण नगरची जागा महायुतीकडे होती,त्यामुळे महायुतीला आम्हाला ती देता आली नाही. दक्षिण नगर तसेच माढा या लोकसभा जागांबाबत आम्ही महायुतीत विचारणा केली होती. दक्षिण नगरमधून निलेश लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण, भाजपने या जागा आमच्यासाठी सोडल्या नाही,”असं अजित पवार म्हणाले.
“निलेश लंकेंनी पारनेर विधानसभेसाठी पत्नीच्या उमेदवारीसाठी सुद्धा आग्रह धरला होता. पालकमंत्री विखे पाटलांनी खूप त्रास दिला असल्याने निलेश लंके महाविकास आघाडीकडे गेले. निलेश लंके यांच्या मित्रांच्या खडी क्रॅशर कंपन्यांना मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला. विखेंच्या त्रासामुळे लंकेंनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला,” असं अजित पवार स्पष्ट केले आहे.
यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवारांनी आचारसंहिता पाळावी. उणी-धुणी काढायचं म्हटलं तर आम्ही देखील ते काढू. मला वाटतं अजित पवारांसारख्या नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर ते योग्य नाही. शिवाजीराव आढळराव पाटील भाजपकडून लढले असते तर आम्ही जिंकलो असतो, असं आम्ही देखील म्हणू शकतो, ” असं दरेकर म्हणाले आहेत.