Maharashtra Politics । अवघ्या काही महिन्यांच्या अंतरावर विधानसभेच्या निवडणूका येऊन ठेपल्या आहेत. विधानसभेपूर्वी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या तोंडावर कोणते नेते पक्षांतर करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तसेच काही नवीन समीकरणे जुळताहेत का? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.
मागील वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून शरद पवारांना मोठा धक्का दिला. अशातच आता विधानसभा निवडणुकांपूर्वी हे दोन्ही नेते एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, अतुल बेनके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार असून त्यांनी नुकतीच शिरूरचे खासदार अमोल कोल्हेंच्या घरी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. तोच धागा पकडून पवारांनीही ज्यांनी लोकसभेत आमच्या राष्ट्रवादीला मदत केली ते आमचे, असं सूचक विधान केलं आहे. त्यांनी अजित पवार आणि शरद पवार एकत्र येण्याबाबतचं विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले अनेक आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनेकदा करत असतात. बेनकेंनी पवारांची भेट घेतल्यामुळे याची अधिकच चर्चा रंगू लागली आहे. पण आता बेनकेंनी थेट काका-पुतणे एकत्र येणार असल्याचं भाकित वर्तवल्यामुळे पडद्याआडून काही घडामोडी सुरू आहेत का? अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.