Maharashtra Politics : देशात आता सर्वात मोठ्या लोकसभा निवडणुकांच्या चर्चा (Maharashtra Politics) जोरात ऐकायला येत आहेत. कारण , आता या निवडणुका फक्त एक वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. राजकीय पक्षांनी जोरात तयारी सुरू केली आहे. युती आणि आघाड्यांमध्येही जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवायचाच या इराद्याने विरोधी पक्ष तयारी करत आहेत. कर्नाटकात काँग्रेसला यश मिळाल्याने विरोधी पक्षांचा आत्मविश्वास वाढला आहे.
या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पुढाकारतून महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली. पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी रविवारी झालेल्या या बैठकीस माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आदी उपस्थित होते.
या बैठकीत तिन्ही पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी 16 जागा लढवाव्यात असा निर्णय झाल्याची चर्चा आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. ठाकरे गट 16, राष्ट्रवादी 16 आणि काँग्रेस 16 जागा लढवेल असे सांगितले जात आहे. असा काही फॉर्म्युला ठरला आहे का, याबाबत मात्र आघाडीच्या नेत्यांनी काहीही स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे संभ्रम कायम आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पटोले म्हणाले, याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. प्राथमिक चर्चा झाली आहे. जागावाटपाचा मुद्दा अजून पुढे सरकलेला नाही.
या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांनी देखील भाष्य केले होते. आव्हाड म्हणाले, मला याबाबत काहीही माहिती नाही. त्या बैठकीत मी आंधळा, मुका आणि बहिरा होतो.