Maharashtra Politics । राज्यात नुकताच विधानपरिषदेचा निकाल लागला. या अटीतटीच्या लढतीत महायुतीने जोरदार कमबॅक केले आहे. या निवडणूकीत महायुतीचे ९ आणि ठाकरे गट आणि काँग्रेसचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाला आहे. शेकापच्या जयंत पाटलांचा दारुण पराभव झाला आहे.
या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली आहेत, अशी कबुलीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहेत. क्रॉस वोटिंग करणारे आमदार आमच्या ट्रॅपमध्ये अडकले आहेत, असेही नाना पटोलेंनी स्पष्ट केलं आहे. यामुळे राजकीय वातावरणात कोणता बदल पाहायला मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.
दरम्यान, विधानपरिषद निवडणूकीत काँग्रेसचं ३७ मतांचं संख्याबळ होतं. त्यात २०२२ प्रमाणे आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्यास काँग्रेसचा उमेदवार पडू शकतो, ही शक्यता वर्तवण्यात येत होती. काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना निवडून आणण्यासाठी २८ मतांचा कोटा ठरवला होता. पण त्यापैकी ३ मतं फुटली तर नार्वेकरांना दिलेली ५ मतं फुटली.
आमदारांनी दगाफटका केल्यानंतरही प्रज्ञा सातवांच्या पराभवाची नामुष्की जरी टळली असली तरी आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने काँग्रेस अॅक्शन मोडवर आली आहे. क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांवर कारवाई केली जाणार असे नाना पटोलेंनी स्पष्ट केले आहे.
राज्यात एकीकडे नाना पटोलेंनी फुटीर आमदारांना इशारा दिला आहे तर दुसरीकडे या फुटीर आमदारांमध्ये विदर्भातील १, मराठवाड्यातील ३, उत्तर महाराष्ट्रातील २ आणि मुंबईतील १ आमदाराचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता फुटीर आमदारांवर कोणती कारवाई केली जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. काँग्रेसच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.