Maharashtra politics । राज्यात महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. असे असल्याने काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळविण्यावर लक्ष केंदित केले आहे.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून चर्चा सुरु आहे. सर्वच पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याची रणनीती आखत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मुंबई आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मित्रपक्ष ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्याशी चर्चा करण्यासाठी समितीची घोषणा केली आहे. या समितीत एकूण 10 नेत्यांचा समावेश आहे.
ठाकरे गट विधानसभा निवडणुकीत सुमारे 115 ते 125 जागा लढवण्याच्या तयारीत असून काँग्रेसने एकूण 150 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एकूण 288 जागांपैकी जागावाटपामध्ये या दोन्ही पक्षांना तडजोड करावी लागेल. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वीही या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली होती. पण अशोक चव्हाण यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिल्ली पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीसाठी नवीन समितीची घोषण केली.
दिल्ली पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या राज्यस्तरीय समितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज बंटी पाटील यांचा समावेश आहे. तर, मुंबई प्रदेश समितीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप आणि माजी मंत्री अस्लम शेख यांचा समावेश आहे.