Maharashtra Politics । आज राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पार पडत असून या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अटीतटीच्या निवडणुकीत कोणाचा पत्ता कट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
येत्या काळात राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींबाबत वेगवेगळे दावे केले जात आहे. मागील 5 वर्षांत देखील अनपेक्षित घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामुळे आगामी काळातसुद्धा अनपेक्षित घडामोडी घडू शकतात. कारण येत्या काळात राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे.
“राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. आता येत्या काळात देखील राज्यातील महायुतीत भूकंप होईल,” असा मोठा दावा काँग्रेस नेते कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार महायुतीत पुन्हा एकदा भूकंप झाला तर राज्याच्या राजकारणात पुन्हा ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“महायुतीच्या विधानसभा निवडणुकीच्या आगामी जागावाटपावर मी आज तर काही बोलू शकत नाही. पण उद्या महायुतीत मोठा भूकंप येईल. तुम्हाला माहिती आहे की, विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा एक उमेदवार पडणार आहे. त्यानंतर आपण बोलू की, कुणाला किती जागा मिळतील. आता कुणाला किती ताकद आहे ते लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली, असेही कैलास गोरंट्याल यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की, तिकीट वाटप भले इथे असेल, पण तिकीट देणारे भाजपचे केंद्रातले मोठे नेते आहेत. भाजप 160 तिकीट शंभर टक्के घेईल. तर इतर दोन पक्षांची जेवढी ताकद आहे तितक्या जागा त्यांना मिळतील. महायुतीच्या जागावाटपामुळे राज्यात बंडखोरी जास्त होईल. कारण प्रत्येक मतदारसंघात शिंदे गटाचा माणूस तयार आहे, अजित पवार गटाचा माणूस तयार आहे, तसेच भाजपचे जुने कार्यकर्ते तयार आहेत. बंडखोरी फार मोठ्या प्रमाणात होईल,” असाही दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.