Maharashtra Politics : शिंदे गटातून बड्या नेत्याची हकालपट्टी, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : सर्व राजकीय पक्षांनी आत्तापासूनच विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करण्यास सुरुवात केली आहे. अनेक नेते आपल्या कार्यकर्त्यांसह पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच आता शिंदे गटाने आपल्या एका बड्या नेत्यावर कारवाई केली आहे.

दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटाच्या बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत मोठे वादळ निर्माण झाले आहे. दरम्यान,बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे निवडून आले आहेत. या मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना खूप मोठा पराभव सहन करावा लागला होता.

त्यामुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील कुंडलिक खांडे यांच्यावर टिका केली होती. शरद पवार गटाचे शिवराज बांगर आणि शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांच्या दरम्यान झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून व्हायरल झालेली क्लिप लोकसभा निवडणुकीच्या काळातील आहे, असे म्हटले जात आहे.

आता त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे. याबाबत शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. संबधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक खूप आक्रमक झाले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते. व्हायरल झालेल्या कुंडलिक खांडे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Leave a Comment