Balu Dhanorkar : राज्यातील काँग्रेसचे (Congress MP Balu Dhanorkar Passed Away) एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे आज पहाटे अखेर निधन झाले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात उपचरादरम्यान दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे वडील नारायणराव धानोरकर यांचे निधन झाले होते. त्यानंतर आज खासदार धानोरकर यांचेही निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या लाटेत राज्यात काँग्रेसची मोठी पिछेहाट होत असताना त्यांनी संघर्ष करत काँग्रेसला चंद्रपुरात विजयी केले. ते राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले. आपल्या 48 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्क करणारा प्रवास केला आहे.
खासदार धानोरकर हे नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना रविवारी हवाई रुग्णवाहकेतून दिल्लीला हलविण्यात आले. येथील मेदांता रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर तालुकाप्रमुख आणि नंतर जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. पुढे 2009 मध्ये याच मतदारसंघातून शिवसेनेने त्यांना तिकीट दिले. त्यांनीही युतीच्या दृष्टीने कधीच सर न झालेला हे मतदारसंघ बांधून काढला होता. निवडणुकीत याचा त्यांना फायदा झाला. पण यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. पुढे 2014 पर्यंत मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्याचे काम त्यांनी केले. वेगवेगळी आंदोलने केली. संघटनात्मक बांधणी केली. त्यामुळे त्यांना यश मिळाले आणि धानोरकर आमदार झाले.
2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत मात्र त्यांनी काँग्रेसकडून नशीब आजमावले. त्यांना अचानकपणे काँग्रेसची उमेदवारी मिळाली. या मतदारसंघात त्यांचा जबरदस्त जनसंपर्क होता या बळावर त्यांनी भाजपच्या या बालेकिल्ल्यात काँग्रेसला विजय मिळवून दिला. संपूर्ण राज्यात जेव्हा काँग्रेसचा दारुण पराभव झाला त्यावेळी याठिकाणी काँग्रेसला विजय मिळवून देत राज्यात काँग्रेसचा पूर्ण सफाया होण्यापासून धानोरकर यांनी काँग्रेसला वाचविले असेच म्हणावे लागेल. धानोरकर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले.
बाळू धानोरकर यांनी कृषी व कला शाखेचे शिक्षण घेतले होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कपड्याचे दुकान देखील सुरू केले होते. त्यानंतर वाहन खरेदीसाठी कर्ज पुरवठा करणारी कंपनी सुरू करून या व्यवसायातही त्यांनी नशीब आजमावले होते. याच काळात त्यांनी राजकारणात प्रवेश करत वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधीत्व केले. आधी आमदार नंतर खासदार असा प्रवास करत त्यांनी कमी कालावधीत राजकीय क्षेत्रात यश मिळवले.