Maharashtra News: मुंबईसह ठाण्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने रविवारपासून जोर धरला आहे. यामुळे मुंबई सह आसपासच्या भागात मुसळधार पावसाचा कहर होताना दिसत आहे.
मात्र, पावसाचा मुंबईच्या लोकल ट्रेन सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व मार्गांवर लोकल गाड्या सुरळीत सुरू असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
आज सकाळपासून मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. दादर, माटुंगा, माहीम, हाजी अली भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईतील कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, भांडुप या उपनगरी भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई आणि उपनगरात दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये 20 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भायखळ्यात 108 मिमी पाऊस
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुंबई आणि उपनगरे तसेच शेजारील ठाणे जिल्ह्यासह लगतच्या भागात येत्या 48 ते 60 तासांत मुसळधार पाऊस पडेल. तर पुढील 48 तासांत अंतर्गत महाराष्ट्रात मुसळधार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील भायखळा येथे 24 तासांत 108 मिमी, चेंबूर 72 मिमी आणि सीएसटीएममध्ये 68.5 मिमी पाऊस झाला.मुंबईत मुसळधार पावसादरम्यान जोरदार वारेही वाहत आहेत.
पुण्यात चिंता वाढली!
दरम्यान पुणे शहरात गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी पाऊस झाला आहे. यंदाच्या जून महिन्यात शहरात केवळ 83.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 2014 मध्ये 13.8 मिमी तर 2022 मध्ये 35 मिमी पाऊस पडला होता. जुलै महिन्याचे 15 दिवस संपले असून आतापर्यंत केवळ 40 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी आहे. त्यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे.
नाशिकमध्ये जोरदार पाऊस
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात मात्र जोरदार पाऊस झाला. या हंगामात येथे 384 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर इगतपुरी, पेठ, त्र्यंबक येथे 200 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली. मात्र इतर तालुके अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. कमी पावसामुळे अन्नदात्यांसह प्रशासनही चिंतेत आहे