Maharashtra News: राज्यातील सातारा जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील खटाव तालुक्यात काल रात्री दोन समुदायांमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळच्या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
तर दुसरीकडे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि शांतता प्रस्थापित करण्यात मदत करा, असे आवाहन पोलिस-प्रशासनाने केले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात रविवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावरील कथित आक्षेपार्ह पोस्टवरून जातीय संघर्ष झाला. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून किमान तीन जण जखमी झाले आहेत. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
कलम 144 लागू
सातारा पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हाणामारी दरम्यान मृत गंभीर जखमी झाला होता. काही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्याची परिस्थिती पाहता सातारा जिल्हा प्रशासनाने परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. तसेच खबरदारी म्हणून कलम 144 लागू करण्यात आले आहे.
कारवाई सुरू
प्राथमिक माहितीनुसार, सातारा जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 50 किमी अंतरावर असलेल्या पुसेसावळी गावात रात्री दोन समाजात वाद झाला . पोलिसांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर केलेल्या एका वादग्रस्त पोस्टमुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला होता.
यावेळी हल्लेखोरांनी दगडफेक करून आग लावली. ज्यामध्ये काही घरांचेही नुकसान झाले आहे. अनेक दुकाने आणि वाहनांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्यांची ओळख पटवून त्यांना अटक करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
पोलिसांनी सांगितले की, एका समाजातील काही तरुणांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर गावात दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला आणि काल रात्री जातीय संघर्ष झाला. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात बंदोबस्त वाढवला असून सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत.