Maharashtra News: पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) मुंबईमध्ये येऊन मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika) काबीज करण्याचा निर्धार करत असताना इकडे मात्र त्यांच्याच युतीतील आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Minister Ramdas Athavale) यांनी शड्डू ठोकला आहे. मुंबईच्या महापौर पदावर दावा करताना आठवले म्हणाले की, भाजप व शिंदे गटासोबत युती करून आम्ही मुंबई महापालिका लढवणार आहोत. जर महापौर पदावर आरक्षण पडले तर आरपीआयचा महापौर झाला पाहिजे.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी पत्रकार भवनात आयोजित वार्तालापात आठवले बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट, सरचिटणीस पांडुरंग सरोदे, खजिनदार अभिजीत बारभाई यावेळी उपस्थित होते. आठवले म्हणाले, लोकसभेसाठी आम्हाला भाजपने यापूर्वी दोन ते तीन जागा दिल्या होत्या, मात्र त्या जागांवर आम्ही निवडणूक आलो नाही. विधानसभेलाही आम्हाला जागा मिळतात, पण आमची माणसे निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरत आहेत. आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्ष भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार आहे. परंतु लोकसभा व विधानसभा निवडणूक रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या निवडणूक चिन्हावर लढवणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल. पुणे महापालिका निवडणुकीसाठी (Pune Municipal Corporation Election Politics News) आम्ही 25 जागा मागणार आहोत. तिथे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे स्थानिक पदाधिकारी ठरवतील.