Sharad Pawar on Sanjay Raut’s Statement : कर्नाटकातील काँग्रेस (Karnataka Election) पक्षाच्या विजयानंतर अन्य राज्यात विरोधी पक्षांनी निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आगामी काळात महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड या मोठ्या राज्यात निवडणुका होणार आहेत. भाजपविरोधी पक्षांना एकत्र करून राजकीय गणिते मांडली जात आहेत. राज्यातही घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत.
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका विचारात घेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. तिन्ही पक्षांच्या जागावाटपाबाबत विविध तर्क लावले जात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. आघाडीतील नेते तसेच विरोधी पक्ष भाजपातील नेत्यांनी राऊत यांना चांगलेच फैलावर घेतले.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जागा वाटपावर अद्याप कोणतीच चर्चा झालेली नाही. अजून अवकाश आहे. राऊतांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. प्रत्येकालाच असा अधिकार आहे. आम्ही एकत्र बसू आणि यावर सांमजस्याने मार्ग काढू.
राऊत नेमकं काय म्हणाले ?
जागावाटपात ठाकरे गटाला किती जागा मिळतील असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर राऊत म्हणाले, आम्ही काय बाजारात उभे आहोत का, आमचे लोकसभेत 19 खासदार असतील. आम्ही त्या जागा जिंकलेल्या आहेत. त्या जागा आमच्याच राहणार. राष्ट्रवादीनं चार जागा जिंकल्या आहेत. त्यावर कशी चर्चा होणार, काँग्रेसनं जरी चंद्रपूर येथील एक जागा जिंकली असली तरी ती एक जागा त्यांच्याकडेच राहणार आहे.
जिंकलेल्या जागा या जिंकलेल्या असतात. त्या जिंकून आल्यानंतर कोण इकडे गेला तिकडे गेला तर त्याने फरक पडत नाही. पण जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे आमचे आज राज्यात 18 आणि दादरा नगर हवेलीत एक खासदार निवडून आला आहे. एकूण 19 खासदार आमचे आहेत. तो आमचा आकडा कायम राहिल, असे मी म्हणतो. ही काही आमची मागणी नाही.
महाविकास आघाडीत अडचणी निर्माण करू नका – पटोले
दरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीही नाराजी व्यक्त केली होती. पटोले म्हणाले, जागांसाठी लढण्यापेक्षा जागा कशा जिंकता येतील यावर चर्चा करण्याची काँग्रेसची भूमिका आहे. लोकसभेच्या मेरिटच्या आधारावरच जागा वाटप व्हावं. जागावाटपाबाबत अजून काहीही ठरलेलं नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या पुढील रणनितीत अडचणी निर्माण करू नये, असे आमचे म्हणणे आहे.