Maharashtra Monsoon Update: पुढील 48 तास सावधान, पुणे, मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी

Maharashtra Monsoon Update: संपूर्ण राज्यात आता मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार (Heavy Rain) तर काही भागात रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे.

 तर दुसरीकडे मंगळवारपासून कोकण भागात मान्सूनने जोर धरला आहे. मान्सून सक्रिय झाल्यामुळे मंगळवारपासून मुंबई (Mumbai) आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी पावसाचा जोर वाढला असून अनेक भागात मुसळधार पाऊस झाला.

यातच आता भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात पुढे 48 तास मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी सकाळी हलका पाऊस झाला आणि रात्रीपर्यंत अधूनमधून पाऊस सुरूच होता. मुंबईच्या कुलाबा हवामान केंद्रात 55.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर सांताक्रूझ हवामान केंद्रात गुरुवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात 20.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे, असे IMD डेटाने दर्शविले आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) वरिष्ठ शास्त्रज्ञ सुनील कांबळे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील पावसाचा वेग थोडा मंदावला होता, मात्र आता पावसाने जोर धरला आहे. मान्सून जोर धरू लागला आहे.

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 19 आणि 20 जून रोजी मुंबईसह कोकण विभागातील काही ठिकाणी मुसळधार (64.5-115.5 मिमी) ते अति जोरदार (115.5-204.4 मिमी) पाऊस पडल्याची शक्यता आहे. तर 21-23 जून दरम्यान काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो.

Leave a Comment