Maharashtra IMD Alert : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे.
सध्या राज्यातील बहुतेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) बुधवारी महाराष्ट्राच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
पुणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी 21 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 21 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या राज्यांमध्ये 23 जुलैपर्यंत पाऊस पडेल
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच 19 जुलै रोजी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, अकोला, पालघर, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम, यवतमाळ, सिंधुदुर्ग, नंदुरभर, धुळे, या ठिकाणी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पुढील पाच दिवसांत कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता IMD ने वर्तवली आहे. केंद्रीय हवामान संस्थेने म्हटले आहे की, उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात पुढील 4-5 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने उत्तराखंडसाठी 19, 20 आणि 22 जुलैला यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय 21 जुलैपर्यंत डोंगराळ भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आता हिमाचल प्रदेशबाबत बोलायचे झाले तर 22 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. IMD ने मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 22 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
बिहारबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासांत उत्तर भागात बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली आहे. तर येत्या काही दिवसांत पाटणा आणि आसपासच्या भागात अंशत: ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानुसार, बिहारमध्ये 19 जुलै ते 23 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.