Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर राज्य सरकारने रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत आता महत्वाची माहिती हाती आली असून मंत्रिमंडळ विस्ताराच्या तारखेसह संभाव्य मंत्र्यांची नावेही समोर आली आहेत. या विस्ताराबाबत टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे.
पुढील आठवड्यात 23 किंवा 24 मे रोजी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून हा विस्तार रखडला होता. त्यामुळे शिंदे गटातील अनेक आमदारांचे टेन्शन वाढले होते. काही जणांनी तर नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. आता मात् मंत्रिमंडळ विस्तारासाठी वेगाने घडामोडी घडत असल्याची माहिती आहे.
यामध्ये कुणाला मंत्रीपदी संधी मिळणार याचीही काही माहिती मिळाली आहे. शिंदे गटाकडून भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, बच्चू कडू यांची नावे चर्चेत आहेत.
या विस्तारात भाजपाचे 9 आणि शिंदे गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर यंदा मंत्र्यांच्या खात्यांचाही फेरबदल केला जाणार असल्याची माहिती आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. त्यामुळे राज्य सरकारवर विरोधक नेहमीच टीका करत आले आहेत. आता या मंत्रिमंडळात कोणत्या महिला नेत्याची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सर्व मिळून 50 आमदार आल्याने प्रत्येकालाच मंत्रीपदाची अपेक्षा होती. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. काही आमदारांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. यामध्ये संजय शिरसाट आणि बच्चू कडू आघाडीवर राहिले. आताही 28 जागा रिक्त आहेत.