Maharashtra Cabinet Expansion: देशात पुन्हा एकदा एनडीएची सारखा स्थापन झाली आहे. 09 जुन रोजी पंतप्रधान मोदींसह 72 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. तर आता राज्यात देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस 2 जुलै 2023 रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाली. त्यावेळी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांच्या गटातील नेत्यांना मंत्री करण्यात आले होते.
अजित दादांनी 2 जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पवार गटाकडे अर्थ,सहकार, कृषी अशी महत्त्वाची खाती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती.
लोकसभा निवडणुकीत महायुती आघाडीच्या खराब कामगिरीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. जेणेकरून या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आणता येईल.
कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळणार?
रविवारी दिल्लीत एनडीए सरकारच्या 72 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र त्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एकच राज्यमंत्रिपद मिळाले तर अजित पवार गटाला एकही मंत्रिपद मिळाले नाही. त्याची भरपाई राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात भाजप करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे येत्या एक ते दोन आठवड्यांत शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात चांगली कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांना पदावरून हटवले जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. भाजपही मंत्रिमंडळात तरुण चेहऱ्यांना संधी देणार आहे.