Madha Lok Sabha Constituency : शरद पवार गटाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची (Madha Lok Sabha Constituency) पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये मात्र माढा मतदारसंघाचा समावेश नव्हता. त्यामुळे माढ्यातील उमेदवारीचा तिढा कायम राहिल्याचे दिसून येत आहे. महायुतीने माढा मतदारसंघातून रणजीत सिंह निंबाळकर यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. निंबाळकर यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीत नाराजी उफाळून आली होती. अकलूजमधील मोहिते कुटुंबीय भाजपवर प्रचंड नाराज झाले होते. यानंतर धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु यानंतर पुढील हालचाली मात्र थंडावल्या आहेत.
शरद पवार यांच्यासमोर (Sharad Pawar) माढ्याच्या उमेदवारीचा तिढा आहे की शांत व संयमी भूमिका घेत त्यांनी अद्याप माढ्याचा उमेदवार जाहीर केलेला नाही याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार गटाला किती जागा मिळतात याबाबत अजून निश्चित माहिती मिळालेली नाही. तरीदेखील पहिल्या टप्प्यात पक्षाने पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये बारामती, शिरूर, दिंडोरी, वर्धा आणि नगर या पाच जागांचा समावेश आहे. आता यानंतर शरद पवार यांच्या वाट्याला येणाऱ्या माढा, सातारा, बीड आणि भिवंडी या चार जागांवरील उमेदवारांचा निर्णय अजून झालेला नाही.
Nilesh Lanke : लंकेंना थोरातांची साथ; तिकीट मिळताच संगमनेरात घेतली भेट, चर्चा काय?
Madha Lok Sabha
माढा लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याबरोबरच डॉ. अनिकेत देशमुख, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील, माणमधील उद्योजक अभयसिंह जगताप या चार नावांची चर्चा आहे. या चारही नावांमध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर आहे तसेच अनिकेत देशमुख यांच्या नावाचाही विचार केला जात आहे. त्यामुळेच कदाचित माढामध्ये उमेदवारांची घोषणा करण्यास विलंब होत असल्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील (Solapur News)माढा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे साताऱ्यातील उमेदवार निश्चित करताना माढ्याचा फायदा माढा व सातारा असाही संबंध लावला जाण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा मतदारसंघावर पहिला दावा धैर्यशील मोहिते पाटील यांचा आहे. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अनिकेत देशमुख यांचाही दावा आहे असे बैठकीत ठरले आहे, अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली होती.
Madha Lok Sabha
दरम्यान, महायुतीतून रणजीत सिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याने मोहिते पाटील कुटुंब नाराज झाले होते. जयसिंह मोहिते पाटील यांनी माढा, सोलापूर, सातारा, बारामती इथून भाजपला घालवण्याची भूमिकाही जाहीर केली होती. यानंतर भाजपकडून संभाव्य डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे यांच्याबरोबर एक तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना अकलूजमध्ये पाठविणार अशी चर्चा होती. परंतु महाजन काही अकलूज मध्ये पोहोचले नाहीत.
दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील यांनी मात्र मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू ठेवला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. परंतु कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढविणार हे अद्याप निश्चित नाही. याआधी मोहिते पाटील यांनी महायुतीकडे उमेदवारीची मागणी केली होती. परंतु महायुतीने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनाच पुन्हा तिकीट दिले.
त्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांना तिकीट मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मोहिते पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार होते तशी तयारीही करण्यात आली होती. परंतु त्यांचा प्रवेश अजून तरी झालेला नाही त्यामुळे आगामी काळात या मतदारसंघात काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.