Madha Lok Sabha Aniket Deshmukh prepare to Contest Independent : राज्यात माढा लोकसभा मतदारसंघ जास्त चर्चेत (Madha Lok Sabha) आहे. या मतदारसंघातून शरद पवार गटाने भाजपमधून प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने विद्यमान खासदार रणजित सिंह निंबाळकर यांना पुन्हा मैदानात उतरवले आहे. परंतु या मतदारसंघात आता महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. शरद पवार गटाने धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे काही नेते नाराज झाले आहेत. या नाराज नेत्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ. अनिकेत देशमुख हे उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. शरद पवार गटाने मोहिते पाटील यांना उमेदवारी दिल्याने अनिकेत देशमुख नाराज झाले होते. त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलूनही दाखवली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अडचणी मात्र वाढणार आहेत.
Baramati Lok Sabha | बारामतीत अजितदादाही रिंगणात? ‘या’ कारणामुळे महायुतीनं केलं खास प्लॅनिंग
Madha Lok Sabha
या मतदारसंघात आधी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा होती. जानकर आणि शरद पवार यांच्यात चर्चाही झाली होती. परंतु जानकर ऐन वेळेस महायुतीकडे गेले त्यांना महायुतीने परभणीचे तिकीट दिले. यानंतर मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची असा प्रश्न शरद पवार गटासमोर होता. त्यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर होते. परंतु मोहिते पाटील पक्षात प्रवेश करण्याआधी अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु पुढे राजकारणाचा विचार करून पवार गटाने अनिकेत देशमुख यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात घेऊन तिकीटही दिले. या राजकारणामुळे अनिकेत देशमुख नाराज झाले आहेत.
ज्यावेळी उमेदवार मिळत नव्हता त्यावेळी आमच्या नावाची चर्चा होती. परंतु नंतर निष्ठावंत उमेदवार असतानाही भाजपमधून आयात केलेला उमेदवार उभा केला आणि आमची फसवणूक केली, अशा शब्दात देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. आता मी जिंकण्यासाठीच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
Madha Lok Sabha
कोण आहेत अनिकेत देशमुख?
अनिकेत देशमुख हे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही अनिकेत देशमुख यांनी नशीब आजमावले होते. या निवडणुकीत त्यांचा फक्त 700 मतांनी पराभव झाला होता. यानंतर लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ते पुन्हा इच्छुक होते परंतु शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. तरी देखील त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे आणि आता अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. जर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली तर महाविकास आघाडीच्या अडचणी निश्चितच वाढणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.