अहमदनगर : जिल्ह्यात लम्पी स्किन हा घातक आजार नियंत्रणात येत आहे असे वाटत असतानाच आजार पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. सध्या बाधित आणि मृत्यू होणाऱ्या जनावरांच्या संख्येत वेगाने वाढ होत चालली आहे. मंगळवारपर्यंत (15 नोव्हेंबर) तब्बल 29 हजार 47 जनावरांना आजाराने संक्रमित केले तर 1842 जनावरांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 19 हजार 453 जनावरे बरी झाली आहेत. जनावरांचे लसीकरण केलेले असतानाही आजार आटोक्यात आणण्यात अपयश येत आहे. अशी परिस्थिती असली तरी सध्या लसीकरण हाच पर्यात आहे. त्यामुळे पशुसंवर्धन आयुक्तांनी ज्या जनावरांचे अद्याप लसीकरण झालेले नसेल त्यांना शोधून लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच वासरांचे लसीकरणही करण्याच्या सूचना आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी या आजाराने बाधित जनावरे आढळली आहेत. काही जनावरांचा मृत्यूही झाला आहे. नगर जिल्ह्यात आजार वेगाने फैलावत आहे. ऑगस्टपासून या आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सुरुवातीला प्रमाण कमी होते. नंतर मात्र वेग वाढला. आता तर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात बाधित जनावरे आढळून येत आहेत. आजार नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आजार नियंत्रणात येत असल्याचे वाटत होते. मात्र, जोरदार पावसामुळे पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले. पावसाच्या काळात जनावरांची प्रतिकार शक्ती कमी झाल्याने आजार वेगाने पसरल्याचे आता सांगण्यात येत आहे. या काळात मृत्यू संख्येतही वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आजाराचा धोका वाढत चालल्याने पशुपालक शेतकरी काळजीत पडले आहेत.
दरम्यान, बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक म्हणजे बाधित 29 हजार 47 जनावरांपैकी 19,453 जनावरे या घातक आजारातून बरी झाली आहेत. जिल्ह्यात हा आजार अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. आजाराचा फैलाव आधिक वाढू नये यासाठी जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाने वेगाने लसीकरण केल्याने जिल्ह्यात लसीकरण पूर्ण झाले आहे. तरी देखील जी जनावरे राहिली असतील त्यांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात अशी जनावरे आणि काही वासरे मिळून 660 जनावरांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातून देण्यात आली.
- Must Read : Lumpy Skin Disease : बाब्बो.. आजाराचा धोका वाढला..! एकाच दिवसात ‘या’ जिल्ह्यात सापडले ‘इतके’ बाधित
- Lumpy skin disease: लम्पी लसीकरणात ‘हे’ राज्य आघाडीवर; ऑक्टोबरअखेर पर्यंत इतके आहे लक्ष्य