अहमदनगर : लम्पी स्किन या घातक आजाराचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. बाधित जनावरांची संख्या वाढत चालल्याने या आजाराला अटकाव करण्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. जनावरांचे लसीकरण, रोगनमुने गोळा करणे, बाधित जनावरांवर उपचार करणे या महत्वाच्या उपाययोजना वेगाने केल्या जात आहेत. असे असतानाही दुसरीकडे मात्र या आजाराचा विळखा घट्ट होत चालला आहे. हा आजार आता अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 1149 गावांत पोहोचला असून आतापयर्यंत 35 हजार 912 जनावरे बाधित झाली आहेत. दिलासादायक म्हणजे, पशुसंवर्धन विभागाने तातडीने औषधोपचार केल्याने यातील 25 हजार 886 जनावरे या आजारातून बरी झाली आहेत. मात्र, 2371 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी या आजाराने बाधित जनावरे आढळली आहेत. काही जनावरांचा मृत्यूही झाला आहे. नगर जिल्ह्यात आजार वेगाने फैलावत आहे. आजार आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील पशुधनाचे लसीकरण केले आहे. तसेच जनावरांचे बाजार बंद केले आहेत. जिल्ह्यात गोजातीय प्रजातींची बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्याच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्याच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य किंवा असे प्राणी नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, बाधित जनावरांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक म्हणजे बाधित 35 हजार 912 जनावरांपैकी 25 हजार 886 जनावरे या घातक आजारातून बरी झाली आहेत. जिल्ह्यात हा आजार अद्याप पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. आजाराचा फैलाव आधिक वाढू नये यासाठी जनावरांचे लसीकरण केले आहे.

विशेष म्हणजे, उत्तर भारतातील राज्यांमध्ये आजार आटोक्यात आला आहे. फक्त महाराष्ट्रातच आजार अद्याप नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या दोन अधिकाऱ्यांचे पथक नगर जिल्ह्यात येऊन गेले. त्यांनी येथील आजाराचा आढावा घेतला. आजार का आटोक्यात येत नाही, येथे लम्पीग्रस्त जनावरांना कोणती औषधे दिली जात आहेत, जनावरांचा आहार काय आहे हे जाणून घेतले. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश दिले.

Share.

Leave A Reply

Exit mobile version