LPG Price : सध्या सण उत्सवांचे दिवस सुरू आहेत. या काळात ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी आम आदमीला काहीसा दिलासा मिळाला आहे. आज कंपन्यांनी घरगुती गॅस टाकीच्या दरात (LPG Latest Price) कोणताही बदल केलेला नाही. हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस (Commercial LPG) टाकीच्या दरात कपात केली आहे. घरगुती सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. IOCL नुसार 1 ऑक्टोबरपासून दिल्लीत इंडेनच्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 25.5 रुपये, कोलकाता 36.5 रुपये, मुंबई 32.5 रुपये, चेन्नईमध्ये 35.5 रुपये कमी असेल. 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या किमतीतच उपलब्ध असेल.
दिल्लीत इंडेन कंपनीचा 19 किलोचा सिलिंडर 1885 रुपयांऐवजी 1859.5 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये एक व्यावसायिक सिलिंडर 1959 रुपयांना मिळणार आहे. याआधी ते 1995.50 रुपयांना उपलब्ध होते. त्याचबरोबर मुंबईत (Mumbai) व्यावसायिक सिलिंडर 1844 रुपयांऐवजी 1811.5 रुपयांना मिळणार आहे. चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडर 2009.50 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी 2045 रुपयांना उपलब्ध होते.
14.2 किलो सिलिंडर कोलकात्यात 1079 रुपये, दिल्लीत 1053 रुपये, मुंबईमध्ये 1052.5 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.5 रुपयांना मिळणार आहे. देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅसच्या किंमत निश्चित करतात. व्यावसायिक एलपीजी गॅस बहुतेक हॉटेल्स (Hotels), खाद्य पदार्थांची दुकाने इत्यादींमध्ये वापरला जातो. त्यामुळे त्यांना किमतीतील कपातीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. सलग पाचव्या महिन्यात व्यावसायिक गॅसच्या किमती कमी झाल्या आहेत.