LPG cylinder : महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारच्या या घोषणेमुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारने LPG सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त केल्या आहेत. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
सरकारने महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच आणि करोडो कुटुंबांचा आर्थिक भार कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठी खूप उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारू शकते,” अशा आशयाची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
नवीनतम किंमत
हे लक्षात घ्या की 9 वाजेपर्यंत इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर अपडेट केले नव्हते. किमतीचा विचार केला तर विनाअनुदानित 14 किलो घरगुती LPG सिलिंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये इतकी आणि कोलकात्यात 929 रुपये इतकी आहे. पण आता सरकारच्या घोषणेनंतर दिल्लीत 803 रुपये आणि कोलकात्यात 829 रुपयांना मिळेल.
मुंबईत सिलिंडर 902.50 रुपयांऐवजी 802.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांऐवजी 818.50 रुपयांना मिळेल. घरगुती सिलिंडरच्या किमती 30 ऑगस्ट 2023 रोजी बदलल्या होत्या. 1 मार्च 2023 रोजी दिल्लीत एलपीजीचा दर प्रति सिलिंडर 1103 रुपये आणि यानंतर ते एकाच वेळी 200 रुपयांनी स्वस्त करण्यात आला.
उज्ज्वला योजनेचे लाभार्थी
केंद्राने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 2024-25 या वर्षातही प्रति सिलिंडर 300 रुपये अनुदान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून 10 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ मिळेल. त्यांना वर्षभरात 12 सिलिंडरवर सबसिडी मिळणार आहे. दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 903 रुपये आहे परंतु योजनेअंतर्गत 603 रुपयांना सिलिंडर उपलब्ध होईल.