Loksabha Election 2024: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच देशातील सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे.
राज्यात देखील भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यातच मिळालेल्या माहितीनुसार भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) मध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे.
तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची बुधवारी महत्त्वाची बैठक झाली.
वृत्तानुसार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीने अनेक दिग्गजांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासोबतच पक्ष युवा नेत्यांनाही संधी देणार आहे. त्याअंतर्गत कोल्हापूर लोकसभेतून आमदार हसन मुश्रीफ आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील आणि करणसिंह गायकवाड यांना उमेदवारी देण्याची तयारी राष्ट्रवादीने सुरू केली आहे.
यासोबतच माजी मंत्री धनंजय मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र पक्षाने अद्याप एकाही जागेसाठी उमेदवाराचे नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. मात्र या बैठकीत लोकसभेच्या जागांसाठीच्या उमेदवारांच्या नावांवर निश्चितच चर्चा झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत मतभेद स्पष्टपणे दिसत आहेत. महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नुकत्याच झालेल्या विधानांमुळे वाद आणखी पेटला आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जागावाटपाबाबत मवाळ भूमिका घेत शिवसेनेला जागा सोडण्याचे संकेत दिले आहेत.
पुण्यातील भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच याठिकाणी उमेदवार उभे करण्यासाठी मविआ पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दावा केला आहे.