अहमदनगर : शरीराचे सर्वांगिण आरोग्य राखण्यासाठी नेहमी सकस आणि पौष्टिक आहाराच्या सेवनाकडे लक्ष दिले पाहिजे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी आहार विशेष भूमिका बजावू शकतो. कामाच्या दबावामुळे आणि विविध सामाजिक कारणांमुळे अलिकडच्या वर्षांत लोकांमध्ये विविध मानसिक आरोग्य समस्यांची प्रकरणे वाढली आहेत. मानसिक आरोग्य समस्या जसे की तणाव आणि चिंता सहसा हलक्यात घेतल्या जातात. परंतु ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकतात.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये. जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी योग्य ठेवून मानसिक समस्यांचा धोका कमी केला जाऊ शकतो. जाणून घेऊ या त्या गोष्टींबद्दल ज्यांचे सेवन तुमचा मूड चांगला ठेवण्यासाठी तर उपयोगी आहेच. पण मेंदूचे पोषण आणि त्याची कार्ये सुलभ करण्यासाठीही ते उपयुक्त मानले जाते.
खाण्यापिण्याची काळजी घ्या : संपूर्ण धान्याचे सेवन अनेक प्रकारे फायदेशीर मानले जाते. पण तुम्हाला हे माहीत आहे का की ते तुमचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासही उपयुक्त आहे? संपूर्ण धान्यांमध्ये जटिल कार्बोहायड्रेट आणि विविध प्रकारचे पोषक असतात. याव्यतिरिक्त, संपूर्ण धान्य मेंदूला ट्रिप्टोफॅन शोषण्यास मदत करतात. मेंदूचे कार्य वाढवताना नैराश्य आणि चिंतेची लक्षणे कमी करण्यासाठी देखील हे फायदेशीर असल्याचे मानले जाते.
पालकाचे सेवन फायदेशीर : पालक आणि इतर पालेभाज्या तुमच्या मेंदूला पुरेशा प्रमाणात फॉलिक अॅसिड देतात. ज्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो. ज्या लोकांना मानसिक आरोग्यामुळे झोपेचा त्रास होतो त्यांच्यासाठीही पालकाचे सेवन फायदेशीर मानले जाते. अभ्यास दर्शविते की पालकामध्ये अनेक संयुगे असतात जे वृद्ध लोकांमध्ये डिमेंशियाचा धोका कमी करण्यास देखील मदत करू शकतात.
सुका मेवा खूप फायदेशीर : सुका मेवा ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो, जे नैराश्याशी लढण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, काजूमध्ये मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियम असते, जे मेंदूला ऑक्सिजन प्रदान करण्यास मदत करते.
दुसरीकडे, बदामामध्ये फेनिलॅलानिन नावाचे एक संयुग असते. जे मेंदूला डोपामाइन आणि इतर न्यूरोट्रांसमीटर तयार करण्यास मदत करते आणि तुमचा मूड राखण्यासाठी उपयुक्त आहे. पार्किन्सन रोगाची लक्षणे कमी करण्यासाठी फेनिलॅलानिन देखील प्रभावी असल्याचे मानले जाते.