मुंबई : कोरोना काळात अनेक बदल झाले आहेत. सध्या अनेक कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. ऑनलाइन कामकाज सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे साहजिकच कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन या साधनांचा वापर वाढला आहे. या पद्धतीने कामकाज अगदी कमी वेळात होत आहे. मात्र, लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तासनतास कॉम्प्युटर, लॅपटॉपवर काम केल्याने पाठदुखी, मानदुखीचा त्रास उद्भवण्याची शक्यता असते. तसेच डोळ्यांना सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आपले डोळे फार संवेदनशील असतात. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. जास्त वेळ काम केल्याने डोळ्यांत जळजळ आणि थकवा जाणवतो, यामागे अन्यही काही कारणे असू शकतात.
अयोग्य दिनचर्या, पुरेशी झोप न घेणे, आहारात पौष्टिक घटकांची कमतरता आणि तासनतास मोबाइल किंवा लॅपटॉपवर काम केल्याने डोळ्यांवर सर्वाधिक दुष्परिणाम होतो. या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मधून जो लाईट बाहेर पडतो तो डोळ्यांसाठी नुकसानदायक आहे. त्यामुळे डोळे दुखणे, अंधुक दिसणे, मानेत दुखणे असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही सोप्या उपायांनी आपण आपल्या डोळ्यांची काळजी घेऊ शकतो.
स्क्रीन आणि आपल्यात योग्य अंतर असणे खूप महत्त्वाचे आहे. कमीत कमी एक फुटांचे अंतर असणे आवश्यक आहे. जर आपण कमी प्रकाशात कामकाज करत असाल तर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या तीव्र प्रकाशामुळे आपले डोळे खराब होऊ शकतात. त्यामुळे योग्य प्रकाश असेल याची खात्री करणे गरजेचे आहे.
आपण काम करत असताना जास्त प्रदूषण नसेल याची काळजी घेणे आवश्यक आहे. जास्त प्रदूषण असेल तरी सुद्धा डोळ्यांना नुकसान होऊ शकते.
जर आपण लॅपटॉप किंवा मोबाइलवर जास्त वेळ काम करत असाल तर डोळ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रोटेक्शन ग्लासेसचा वापर करू शकता. जेणेकरून डोळ्यांना कमीत कमी त्रास होईल. जर आपण जास्त वेळ लॅपटॉपवर काम करत असाल तर साधारण 20 मिनिटे कामकाज केल्यानंतर काही काळ ब्रेक घ्या त्याने सुद्धा डोळ्यांची समस्या कमी होण्यास मदत मिळेल.
अर्र.. ‘वर्क फ्रॉम होम’ ने आणलेत ‘हे’ आजार; ‘या’ उपायांनी अशी घ्या आरोग्याची काळजी