अहमदनगर : साबुदाणा असाच एक पदार्थ आहे, जो उपवासाच्या वेळी हमखास वापरला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की साबुदाण्यापासून इडली (sabudana Idli) देखील बनवता येते. हा पदार्थ जितका वेगळा वाटतो तितकाच खायलाही स्वादिष्ट आहे. ही इडली अगदी कमी तेल वापरून बनवता येते. रवा आणि तांदूळ-मसूर यापासून बनवलेल्या इडलीच्या चवीपेक्षा वेगळे काही हवे असेल तर नक्की करून पहा.
साबुदाणा इडली बनवण्यासाठी हे मिश्रण रात्रभर भिजून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून साबुदाणा चांगला भिजतो आणि इडली मऊ होते. 2 कप साबुदाणामध्ये अर्धा कप रवा मिसळा आणि त्यात 2 कप दही टाका आणि रात्रभर झाकून ठेवा. त्यानंतर सकाळच्या नाश्त्यासाठी (Breakfast) साबुदाणा इडली तयार करता येईल.
साहित्य – साबुदाणा 2 कप, रवा अर्धा कप, दही 2 कप, मीठ चवीनुसार, बेकिंग सोडा 1/4 चमचा, रिफाइंड तेल 2 चमचे.
रेसिपी
उन्हाळ्यात आहार तेलविरहित असेल तर आरोग्य चांगले राहते. रात्रभर साबुदाणा आणि रवा दह्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाका. बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करुन मिश्रण हलके फेटा. इडलीच्या साच्यात 2 ते 3 थेंब तेल टाकून पसरवा आणि त्यात साबुदाण्याचे मिश्रण टाका. 15 मिनिटे वाफ येऊ द्या आणि मग साचा काढा आणि इडली थंड होऊ द्या. साच्यातून गरम इडल्या काढताना इडली फुटू शकते, त्यामुळे ती थंड होण्याची वाट पहा.
जर तुम्हाला साबुदाणा इडलीमध्ये फोडणीची चव हवी असेल, तर मिश्रणात 10-12 कढीपत्ता पाने, 1 चमचा भिजलेली चणा डाळ, 1 चमचा भिजलेली उडीद डाळ आणि मोहरीची फोडणी द्या. इडली बनवल्यानंतर तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही इडली तळूनही घेऊ शकता. सांबर-चटणीसोबत सर्व्ह करा. लक्षात ठेवा इडली बनवण्यापूर्वी बेकिंग सोडा इडलीच्या पिठात टाकायचा आहे. सोडा टाकून जास्त वेळ ठेवल्यास इडली मऊ होण्याऐवजी कडक होते.
उपवासासाठी स्पेशल रेसिपी : ‘अशा’ पद्धतीने तयार करा टेस्टी साबुदाणा खीर; सोपी रेसिपी करील मदत..