Sabudana Recipes : श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये सण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जास्त उपवास करावे लागतात. अशा परिस्थितीत उपवासाचे पदार्थ घराघरात तयार केले जातात. यामध्ये शाबुदाण्यापासून तयार होणारे खाद्य पदार्थच जास्त असतात. यंदा अधिकमास आल्याने श्रावणाचा महिना लांबला आहे. तरी देखील या महिन्यात उपवास तर असतातच.
आज या लेखात आम्ही तुम्हाला साबुदाण्यापासून बनवलेल्या काही रेसिपीबद्दल सांगणार आहोत. हे खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल आणि अशक्तपणा जाणवणार नाही.
साबुदाणा खिचडी
साहित्य
२ उकडलेले बटाटे, १ वाटी साबुदाणा, अर्धा वाटी ठेचलेले शेंगदाणे, ३ चमचे तूप, १ चमचा जिरे, हिरवी मिरची, मीठ, कोथिंबीर, अर्धा चमचा साखर.
रेसिपी
सर्वप्रथम साबुदाणा भिजत ठेवा. आता कढईत तूप गरम करून त्यात जिरे टाका. तडतडायला लागल्यावर त्यात हिरवी मिरची उकडलेल्या बटाट्याचे तुकडे टाका. 2-3 मिनिटे चांगले परतून घ्या आणि नंतर बारीक केलेले शेंगादाणे टाका. हे सर्व मध्यम आचेवर दोन मिनिटे परतून घ्या. त्यात भिजलेला साबुदाणा घाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घाला. हे सर्व चांगले मिसळा. झाकण बंद करा आणि काही मिनिटे शिजू द्या. आता थोडे पाणी टाकून कढईवर पुन्हा झाकण ठेवा. दोन मिनिटे शिजू द्या. तुमच्या चवीनुसार त्यात थोडा लिंबाचा रस टाका.
साबुदाणा टिक्की
१ वाटी साबुदाणा, २ उकडलेले बटाटे, अर्धी वाटी शेंगदाणे, २ हिरव्या मिरच्या, १ चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरेपूड, खडे मीठ आणि तळण्यासाठी तेल.
रेसिपी
एका मोठ्या भांड्यात रात्रभर भिजलेला साबुदाणा घ्या आणि त्यात उकडलेले बटाटे, बारीक केलेले शेंगादाणे, मिरची, जिरेपूड, कोरडी कैरी पावडर आणि मीठ टाका. सर्व साहित्य चांगले मिसळा. आता त्यापासून लहान टिक्की बनवा. गॅसवर तवा गरम करा, त्यात थोडे तेल गरम करा. गरम झाल्यावर, साबुदाणा टिक्की दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी आणि दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत तळा.
साबुदाणा थालपीठ
साहित्य
2 कप साबुदाणा, 2 उकडलेले बटाटे, अर्धा चमचा जिरे, शेंगादाणे, 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मीठ
रेसिपी
एका मोठ्या भांड्यात साबुदाणा रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्या दिवशी अतिरिक्त पाणी काढून साबुदाणा पूर्णपणे कोरडा करून घ्या. आता मॅश केलेले बटाटे, जिरे, शेंगदाणे, मिरची, मीठ, साखर आणि लिंबाचा रस सर्व साहित्य नीट मिक्स करून घ्या. त्यानंतर या मिश्रणाचा गोळा तयार करून तो भाकरीसारखा पसरून घ्या. शिजण्यासाठी थोडे तूप किंवा तेल वापरा आणि जेव्हा ते दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईल तेव्हा ते आचेवरून उतरवा.