अहमदनगर : उपवासाच्या दिवशी आपल्याकडे अनेक खाद्यपदार्थ असतात. शाबुदाण्याची खिचडी तर नेहमीच असते. त्यातुलनेत शाबुदाण्याची खीर फारशी दिसत नाही. तसे पाहिले तर शाबुदाण्याची खीर स्वादिष्ट तर आहेच शिवाय तयार करायलाही फार वेळ लागत नाही. तुम्हाला उपवासाच्या दिवशी नेहमीचे खाद्यपदार्थ नको असतील तर स्वादिष्ट अन् वेगळ्या पद्धतीने तयार केलेली खीर चांगला पर्याय ठरू शकतो. साबुदाण्याची खीर बनवायला सोपी आहे. हे एक हलके अन्न आहे जे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. जर तुम्हालाही या उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खीर खायची असेल तर तुम्ही आम्ही दिलेल्या रेसिपीने सहज बनवू शकता.
साहित्य- साबुदाणा अर्धा वाटी, दूध 1/2 लिटर, साखर अर्धा कप, वेलची पावडर 1 चमचा, काजू 10, बदाम 10, पिस्ता 10, कंडेस्ड मिल्क 2 चमचे, चिमूटभर केसर.
रेसिपी
साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा नीट धुऊन घ्या आणि थोडा वेळ पाण्यात भिजू द्या. आता एका भांड्यात दूध घेऊन मध्यम आचेवर गरम करायला ठेवा. दूध उकळायला लागल्यावर थोडे पाणी टाका आणि पुन्हा उकळण्याची वाट पहा. दरम्यान, काजू, बदाम आणि पिस्ता बारीक करुन घ्या. दुधाला दुसऱ्यांदा उकळी आल्यावर त्यात हे ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर टाकून 7-8 मिनिटे शिजू द्या.
दूध चांगले शिजल्यावर त्यात भिजलेला साबुदाणा टाकून मंद आचेवर शिजू द्या. काही वेळाने खीर उकळायला लागली की त्यात कंडेस्ड मिल्क टाका आणि चांगले मिसळून घ्या. यामुळे खीरची चव वाढेल. आता साबुदाणा चांगला फुगून येईपर्यंत खीर उकळायची आहे. खीरमध्ये चवीनुसार साखर टाका. चार ते पाच मिनिटे खीर शिजल्यानंतर त्यात केशर टाकून गॅस बंद करा. स्वादिष्ट साबुदाणा खीर तयार आहे. गरमागरम सर्व्ह करा.
उपवासासाठी हटके रेसिपी : झटपट बनवा कुट्टू पनीर पकोडे..